अपंग समावेशीत शिक्षण

अपंग व्यक्तींना मिळणारे लाभ व सवलती – अपंग समावेशित शिक्षण योजना


या योजनेत सामील होणा-या आठ मुलांच्या एका गटातील प्रत्येक बालकासाठी (वय वर्षे १८ पर्यंत) खालालप्रमाणे लाभ व सवलती मिळतात.
१.  पुस्तके व लेखन साहित्य खरोदीसाठी प्रत्येक बालकास रु. ४०० पर्यंत झालेला प्रत्यक्ष खर्च प्रतिवर्षी मिळते.
२.  गणवेशासाठी प्रत्येक बालकास रु. २०० पर्यंत झालेला प्रत्यक्ष खर्च प्रतिवर्षी मिळतो.
३.  वसतिगृहात किंवा शालेय परिसरात वास्तव्य न करणा-या प्रत्येक बालकास दरमहा ५० रु. परिवहन भत्ता मिळतो.
४.  वसतिगृहात वास्तव्य करणा-या प्रत्येक बालकास दरमहा २०० रु. प्रमाणे (प्रतिवर्षी १० महिने) निवास व भोजन खर्च मिळतो.
५.  दृष्टीहीन बालकांना इयत्ता ५ वी नंतर प्रतिमहा ५० रु. दराने वाचक भत्ता (फक्त १० महिने) मिळतो.
६.  शरीराच्या सर्वांत खालच्या अवयवात तीव्र विकलांगता असणा-या भिन्न भिन्न विकलांग बालकांना दरमहा ७५ रु. दराने मदतनीस भत्ता दिला जातो.
७.  प्रत्येक विकलांग बालकासाठी पाच वर्षांतून एकवेळ आवश्यक सहाय्यभूत उपकरणांच्या खरेदीकरिता रु. २००० पर्यंत आलेला प्रत्यक्ष खर्च उपलब्ध होतो.
८.  अस्थिव्यंग वगळता अन्य विकलांग बालकांच्या ८ जणांच्या अपंग एकात्म शिक्षण युनिटसाठी त्या-त्या विकलांगतेच्या बाबतीत विशेष शिक्षक नियुक्ती व त्याच्या वेतन आणि भत्त्यावरील प्रत्यक्ष खर्च उपलब्ध होतो.
९.  संसाधन खोलीतील साहित्यासाठी एक वेळ रु. ३०,००० अनुदान देण्यात येते.
१०.  संसाधन खोलीच्या बांधकामासाठी एक वेळ रु. ५०,००० अनुदान देण्यात येते.
टिप – वरील दर १९९२ च्या योजनेत निर्धारित करण्यात आलेले असून वाढीव दराचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे.

अपंगाचे शिक्षण व पुनर्वसन योजना


१.  अपंग विद्यार्थ्यांची शासकीय विशेष शाळा / कार्यशाळांमधून विनामूल्य शिक्षण-प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते.
२.  स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या अपंगांच्या विशेष शाळा / कार्यशाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांची विनामूल्य शिक्षण-प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. अशा अनुदानित व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळा / कार्यशाळांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते.
३.  अपंग व्यक्तींना लघुउद्योग सुरु करण्यासाठी बीज भांडवल योजनेखाली रु. १,५०,०००/- पर्यंतच्या व्यवसायासाठी बॅंकेमार्फत ८०% कर्जसाहाय्य व या विभागातर्फे २०% अथवा कमाल रु. ३०,०००/- सबसिडी देण्यात येते.
४.  इयत्ता १ ली (कर्णबधिरांना पायरीपासून) ते १० पर्यंतच्या शिक्षणासाठी, शालांतपूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या या योजनेखाली शिष्यवृत्ती देण्यात येते.
५.  इयत्ता १० वी नंतरचे उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, व्यावसायिक, तांत्रिक, वैद्यकिय व पदव्युत्तर शिक्षणासाठी, शालांत परिक्षोत्तर शिक्षणासाठी अपंग विद्यार्यांना शिष्यवृत्ती या योजनेखाली शिष्यवृत्ती, वसतिगृह भत्ता, अंध विद्यारमथ्यांना वाचक भत्ता, शैक्षणिक शुल्क, अभ्यासदौरा, प्रकल्प टंकलेखन खर्च देण्यात येतो.
६.  विभागीय परीक्षामंडळामधून उत्तीर्ण होणा-या इयत्ता १० वी व १२ वी तील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाच्या अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो.
७.  अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने गरजेनुसार पुरविण्यात येतात.
८.  महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्यादित, गृहनिर्माण भवन (म्हाडा) खोली नं. ७४, तळमजला, बांद्रा, मुंबई यांचे मार्फत व्यवसायासाठी कर्जसाहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.
९.  एस.एस.सी. नंतरचे शिक्षण घेणा-या अंध विद्यार्थ्यांना टेपरेकॉर्डर व को-या ऑडिओ कॅसेटचा संच देण्यात येतो.
१०.  प्रशिक्षित अपंगांना व्यवसायासाठी लागणा-या साधनांकरिता अर्थसाहाय्य देण्यात येते.
११.  अपंग विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुण विकासासाठी राज्यस्तरीय अपंगांच्या क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात येतात.
१२.  अपंगासाठी असलेल्या सोई-सुविधांचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तींना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्यात येते.
१३.  गुणवंत अपंग कर्मचारी व त्यांचे नियुक्तक यांना राज्यपुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

आपले हक्क माहित आहेत का?


अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ या केंद्र शासनाच्या कायद्याने अपंग व्यक्तींना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी, पूर्ण सहभाग व हक्कांच्या संरक्षणाची हमी दिलेली आहे.
अपंग व्यक्तींसाठी उपलब्ध करुन दिलेल्या विशेष सोई-सुविधा व त्यांच्यासाठी राखून ठावलेले हक्क केवळ खालील प्रकारचे अपंगत्व असलेल्या व विहित केलेल्या वैद्यकीय मंडळाकडून ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्रधारक अपंग व्यक्तींनाच मिळतील.
१. पूर्णतः अंध
२. अधू दृष्टी
३. कुष्ठरोगमुक्त
४. कर्णबधिर
५. शारिरीक हालचालींवर मर्यादा आणणारे अपंगत्व किंवा
कोणत्याही प्रकारचा मेंदूचा पक्षघात झालेल्या व्यक्ती (अस्थिव्यंग)
६. मतिमंदत्व
७. मानसिक आजार

अपंग व्यक्ती अधिनियम, १९९५ हा कायदा आपली उद्दीष्टे साध्य करण्याकरीता खालील उपाययोजना करीत आहे

१. अपंगत्व येऊ नये म्हणून अपंगत्व प्रतिबंध व लवकरात लवकर निदान करण्यासाठी आरोग्य विषयक सुविधांची उपलब्धता.
२. अपंग विद्यार्थ्यांना १८ वर्षापर्यंत योग्य अशा वातावरणात मोफत शिक्षण, शिक्षण संस्थांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आरक्षण, शिष्यवृत्ती, मोफत गणवेश व प्रवासासाठी सवलत.
३. अपंग व्यक्ती काम करु शकतील अशा सुयोग्य पदांची निश्चिती व अशा पदांवर शासकीय व निमशासकीय सेवेत अपंग व्यक्तींसाठी ३ टक्के आरक्षण.
४. सार्वजनिक परिवहन पद्धती, नागरी सुविधा व सार्वजनिक इमारती / जागा वापरण्यासाठी अपंग व्यक्तींना अडथळाविरहीत अशा सुविधा.
५. अपंग व्यक्तींना उद्योग, कारखाने, स्वतःचे घर, विशेष शाळा व खास मनोरंजन केंद्र बांधण्यासाठी मदत म्हणून सवलतीमध्ये जमीन वाटप.
६. अपंग व्यक्तींचे पुनर्वसन व सामाजिक सुरक्षा.
७. अपंग व्यक्तीविषयक समस्यांवर संशोधन व मनुष्यबळ विकास.
८. अपंग व्यक्तींसाठी कार्य करणा-या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र. अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ या कायद्यानुसार अपंगत्व नसलेल्या व्यक्तीने अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून अपंगांसाठी असलेल्या विशेष सोई-सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घेतल्यास व ते सिद्ध झाल्यास अशी व्यक्ती रु. २०,०००/- रकमेचा दंड अथवा २ वर्षे तुरुंगवास अथवा दोन्ही शिक्षेस पात्र आहे.
९. अपंग व्यक्तींसाठी असलेल्या विशेष सोई-सुविधा अथवा हक्कांपासून अपंग व्यक्तींना वंचित ठेवल्यास अशी अपंग व्यक्ती आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अभिमत न्यायालयात दाद मागू शकते.
१०. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यात राज्य पातळीवर राज्य समन्वय समिती, राज्य कार्यकारी समिती, आयुक्त, अपंग कल्याण व जिल्हा पातळीवर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती ही यंत्रणा कार्यरत आहे.

कर्णबधिरत्व व त्यांचे वर्गीकरण


कर्णबधिरत्व म्हणजे काय ?
कर्णबधिरत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दुस-याशी बोलणे व वातावरणातील इतर ध्वनी ऐकण्याविषयी अक्षमता. कर्णबधिरत्व कानातील एखाद्या भागाला इजा झाल्याने किंवा एखाद्या रोगामुळे कानाच्या अनैसर्गिक विकासामुळे, जन्माआधी किंवा जन्मानंतर आलेले असते. कर्णबधिरत्वामुळे ऐकण्याच्या क्षमतेला मर्यादा पडतातच पण त्याचबरोबर बोलण्यातही दोष निर्माण होतात. भाषा विकासही खुंटतो.
श्रवणदोषाची अनुवंशिक व परिस्थितीजन्य ही दोन मुख्य कारणे आहेत.

श्रवणदोष व त्याचे वर्गीकरण


अ.क्र.                                    डेसिबल                                  श्रवणदोष

( १)                                  ० ते २५ डी. बी.                        सामान्य श्रवण (श्रवणदोष नाही)
( २)                                  २६ ते ४० डी. बी.                      सौम्य श्रवणदोष
( ३)                                  ४१ ते ५५ डी. बी.                      मध्यम श्रवणदोष
(४)                                   ५६ ते ७० डी. बी.                      मध्यम ते तीव्र श्रवणदोष
(५)                                   ७१ ते ९० डी. बी.                        तीव्र श्रवणदोष
( ६)                                    ९१ डी. बी. च्या पुढे                    अति तीव्र श्रवणदोष

कर्णबधिर प्रतिबंधक उपाययोजना


१. मुलाला कानात काडी, पेन्सील, पीन, खडू असे काही घालू देऊ नये.
२. साचलेल्या पाण्याने आंघोळ घालू नये.
३. साधे पडसे, कान दुखणे किंवा वाहणे यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरील उपचार करुन घ्यावेत.
४. कान वाहणा-या व्यक्तीचे कपडे इतरांनी वापरू नयेत, कपडे रोज उकळलेल्या पाण्याने धुवावेत.
६. जवळच्या नात्यात विवाह करु नये.
७. ध्वनी प्रदुषण असल्यास कानाला संरक्षण घ्यावे.
८. गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
९. गरोदर स्त्रियांनी स्वतःची काळजी घ्यावी. कानाला थंडी लागू देवू नये, पाण्यात भीजू नये, तसेच ताजे व सकस अन्न व उकळलेले पाणी प्यावे.
१०. मातांनी व मुलांनी रोग प्रतिबंधक लसी द्याव्यात.

कर्णबधिर मुलांच्या विकासासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी

१. मुलाला श्रवण सहाय्यक उपकरण वापरायला उत्तेजन द्या.
२. मुलाशी त्याला आवड असेल अशा गोष्टीबद्दल बोला आणि त्याला शाब्दिक प्रतिसाद द्यायला उत्तेजन द्या.
३. पालकांनी कुटूंबातील इतरांना कर्णबधिर मुलांशी बोलायला व त्याचे हावभाव समजून द्यायला उत्तेजन द्या.
४. सारख्या वयाच्या मुलांच्या बोलण्याशी आपल्या कर्णबधिर मुलाची तुलना करु नका.
५. कर्णबधिर मुलाला सामान्य मुलासारखे वागवावे. कारण एक कर्णबधिरत्व सोडले तर इतर बाबतीत ते मूल सामान्य असते.
६. कर्णबधिर हा शाप नाही. प्रतिबंध करता येईल असा एक अपघातच आहे.
७. गावातील सामान्य मुले ज्या शाळेत शिक्षण घेतात, त्याच शाळेत कर्णबधिर मूल शिक्षण घेऊ शकते.
८. शाळेत कर्णबधिर मुलाला पहिल्या रांगेत बसवायला सांगावे, शिक्षकांनी त्याच्यावर अधिक लक्ष द्यावे.
९. आपल्या शेजारील गावात अथवा शहरात विशेष शाळेची सोय असल्यास मुलाला विशेष शाळेत पाठवावे.
१०. शैक्षणिक शिष्यवृत्त्यांची माहिती करुन घ्यावी.
११. शक्य तितके वाकून मुलाच्या पातळीवर या मुलापासून १ मीटर अंतरावरचे बोलणे सर्वात जास्त चांगले ऐकू येते. कधी कधी मुलाच्या कानात बोलावे. डोळ्याला डोळे भिडवून प्रत्यक्ष मुलाकडे पाहून बोलावे.
१२. मुलाशी संपर्क साधतांना आजूबाजूला कमीतकमी आवाज असावा.
१३. कर्णबधिर मुलाला शक्यतो एकच, प्रादेशिक किंवा राष्ट्रीय भाषा शिकवावी म्हणजे उच्च शिक्षणाचा वाव अधिक मिळतो.
१४. विशेष शिक्षणाची सोय नसेल तर मुलाला नर्सरी / बालवाडी / अंगणवाडीत पाठवावे.

मतिमंद बालक जन्माला येऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने घ्यावयाची काळजी


१. नियमित डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन घेणे.
२. समतेल (पोषक) आहार घेणे.
३. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.
४. पहिल्या तीन ते चार महिण्यात क्ष किरण तपासणी टाळावी.
५. धनुर्वाताची लस टोचणे अत्यंत आवश्यक आहे.
६. उंच स्टूलवर किंवा खुर्चीवर चढू नये तसेच जड सामान उचलू नये.
७. प्रसुती नंतर बाळ निळे पडले असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा व ऑक्सीजनची व्यवस्था पाहावी.
९. बाळ त्वरीत न रडल्यास डॉक्टरांची त्वरीत मदत घ्यावी.
१०. प्रसुतीनंतर बाळाचे लसीकरण करावे. (पोलिओ, गोवर, धनुर्वात)
११. बाळाला ताप आल्यास डॉक्टरांस दाखवावे.
१२. वारंवार फिट / मिरगी येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
१३. स्वच्छ उकळुन केलेले पाणी बाळाला पाजावे.

अंधत्वाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय


१. शुष्कडोळे, खुप-या, गोवर, मेंदूची हानी, व डोळ्यांना इजा इत्यादी मुळे अंधत्व येऊ शकते. अंधत्व जन्मतःही असू शकते.
२. अंधत्वाला प्रतिबंध करण्यासाठी अ जीवनलत्व युक्त आहार घेणे आवश्यक आहे.
(  अ जीवनसत्व युक्त अन्नपदार्थ – पालेभाज्या, पिवळी व तांबडी फळे, उदा. पालक, गाजर, पपई, तसेच दूध, मांस आणि अंडी तसेच मातेने पहिली २ वर्षे मुलाला अंगावर पाजणे अत्यंत आवश्यक आहे. )
३. स्वच्छ पाण्याने डोळे वारंवार धुवून स्वच्छ ठेवावेत. घाण फाण्यात पोहू नये. डोळ्याचे माशांपासून रक्षण करावे.
४. खुप-या आलेल्या रुग्णावर त्वरीत इलाज करा. खुप-या संसर्गजन्य असतात आणि स्पर्श व माशांपासून पसरतात.
५. अणकुचीदार अवजारे, फटाके, टोकदार वस्तू किंवा ऍसीड मुलांपासून लांब ठेवावे.
अपंगत्वाच्या दाखल्यासाठी व इतर सोई-सुविधांसाठी संपर्काची ठिकाणे
अ. क्र.
सोई - सुविधा
संपर्काचे ठिकाण
अपंगत्वाचा दाखला, रेल्वे प्रवास सवलत व व्यंग सुधारक शस्त्रक्रिया
संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सामान्य रुग्णालये
बस प्रवास सवलत व अन्य सुविधा करिता अपंग व्यक्तींना ओळखपत्र
विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर / उपनगर व इतर जिल्ह्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण अधिकारी, गट-अ जिल्हा परिषद कार्यालये
आर्थिक उन्नतीसाठी व व्यवसाय करिता वित्तीय साहाय्य
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्यादित, गृहनिर्माण भवन (म्हाडा) खोली नं. ७४, तळमजला, बांद्रा(पूर्व), मुंबई ४०००४१
लघुउद्योगासाठी अपंग व्यक्तींना वित्तीय साहाय्य (बीज भांडवल)
विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर / उपनगर व इतर जिल्ह्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण अधिकारी, गट-अ जिल्हा परिषद कार्यालये
व्यवसाय प्रशिक्षण
शासकीय-प्रौढ-अपंग प्रशिक्षण केंद्र- मिरज
अपंगांच्या शैक्षणिक सुविधांसाठी
उल्हासनगर, औरंगाबाद, नागपूर व अपंगांसाठी आय.टी.आय. वर्धा आणि अनुदानित अपंगांच्या कार्यशाळा
अपंगांच्या नोकरीसाठी नोंदणी
विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर / उपनगर व इतर जिल्ह्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण अधिकारी, गट-अ जिल्हा परिषद कार्यालये

अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व उपकरणे
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालयातील अपंग व्यक्तींसाठींच्या विशेष सेवा योजना कक्ष
१. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, विरार, बोळीज जि. ठाणे
२. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रे
३. अखिल भारतीय भौतिक चिकित्सा व पुनर्वसन संस्थान, हाजिअली, मुंबई
४. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी हिअरींग हॅंडीकॅप, बांद्रा, मुंबई
५. जिल्ह्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण अधिकारी, गट-अ
६. विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर / उपनगर व इतर
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment