अपंग व्यक्तींसाठी लाभदायक सुधारित एडीप योजना

अपंगत्व, वृद्धत्व, अपघात अथवा इजा झाल्यामुळे दैनदिन जीवनात शारीरिक हालचाली किंवा कार्य करण्यात अनेक अडचणी येतात. भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग अपंग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनासाठी विविध योजना राबविते. त्यात अपंग व्यक्तींना सहायक साधने पुरविण्यासाठी एडीप ही एक महत्वपूर्ण योजना आहे. अपंग पुनर्वसनाच्या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अपंग लाभार्थी यांना याबाबत माहिती व्हावी व अधिकाधिक लोकांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यानिमित्ताने या योजनेवर टाकलेला हा प्रकाश.
शारीरिक अपंगत्वामुळे सहजपणे चालणे फिरणे, प्रवास करणे, दैनंदिन कामकाज करणे अवघड होते. बहिरेपणामुळे ऐकणे व बोलणे अर्थात संवाद व संपर्क यामध्ये अनेक अडचणी येतात. अंध व्यक्तीला मुक्त संचार करणे सहज शक्य होत नाही. यामुळेच ही योजना फायदेशीर आहे.
2011 च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे 2.68 कोटी लोक विविध प्रकारचे अपंग आहेत. त्याचबरोबर 14 वर्षे वयोगटाखालील सुमारे 3 % मुले प्रलंबित विकास वर्गात मोडतात. त्यात प्रामुख्याने मतीमंद, सेरेबल पाल्सी आणि बहुविकलांग मुलांचा समावेश आहे. या सर्वच प्रकारच्या अपंगांना विविध प्रकारच्या सहायक साधनाची गरज असते. अपंग व्यक्तीच्या मदतीसाठी सहायक, अडेपटिव्ह आणि पुनर्वसन विषयक असे तीन प्रकारचे तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे. यामध्ये सहायक तंत्रज्ञान अपंग व्यक्तीला त्यांची क्षमता वाढविण्यासाठी तर संगणक आणि इलेक्ट्रॉनिक तत्वावर आधारित अडेपटिव्ह तंत्रज्ञान त्यांची क्षमता विकसित करण्यासाठी मदत करते.
सहायक तंत्रज्ञानाच्या योग्य परिणामासाठी साधनांची योग्य निवड, ती बसविणे व त्यांचा सुयोग्य वापर हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ मिळावा, या हेतूने भारत सरकारने या योजनेत काही महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. त्यात उत्पन्नाची वाढविलेली मर्यादा, बी.टी. श्रवण यंत्र पुरविणे, कॉकलीयर इप्लांटसाठी सहकार्य इत्यादी सुविधा महत्वाच्या आहेत. या सुधारणा 1 एप्रिल 2014 पासून लागू झाल्या आहेत. शारीरिक अपंग व्यक्तीसाठी सहायक साधने  लोकोमोटोर किंवा शारीरिक अपंग व्यक्तीसाठी ट्राय सायकल, व्हील चेअर, क्रचेस, वॉकिंग स्टीक्स, सर्जिकल फूटवेअर ही काही महत्वाची सहायक साधने आहेत. यामध्ये व्हील चेअर हे एक बहुपयोगी सहायक साधन आहे. शारीरिक अपंग व्यक्तीबरोबरच जे लोक आजारपण किंवा अपघात आदी कारणामुळे चालू शकत नाही त्यांना या साधनाच्या मदतीमुळे चालणे फिरणे शक्य होते. ट्राय सायकल हाताने किंवा यांत्रिक मोटर पद्धतीने चालविता येते. याबाबतचे अनुदान 25,000 रु. पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्याचा लाभ 18 वर्षांवरील अपंग व्यक्तिला 10 वर्षांतून एकदाच घेता येतो. दृष्टीहीन व्यक्तीसाठी सहायक साधने  सर्व सामान्य माणसांना दृष्टीहीन व्यक्ती म्हटले की फक्त ‘पांढरी काठी’ माहित असते. पण आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सहायक साधनांचा विकास झाला आहे. ज्यामुळे दृष्टीहीन व्यक्ती आता शिक्षण व रोजगार या क्षेत्रात समर्थपणे काम करीत आहेत. या सहायक साधनांमध्ये ब्रेलमध्ये लिहिलेली पुस्तके, ब्रेल फलक, ब्रेल प्रिंटर, टाकिंग बुक्स, ऑप्टिकल स्कॅनर, टेक्स्ट टू स्पीच सिस्टम, हँड हेल्ड रीडर, ब्रेल राइटर, ब्रेल नोट टेकर, मोबाईल फोन ब्रेल रीडर आदींचा समावेश आहे.
ब्रेल ही लुईस ब्रेल यांनी विकसित केलेली भाषा आहे. कागदावर केलेले उठाव स्पर्शाच्या माध्यमातून या पद्धतीत वाचले जातात. संगणक तंत्रज्ञानाची जोड आता या सहायक साधनांना मिळाली आहे. सुधारित योजनेनुसार 18 वर्षांवरील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मोबाइल फोनची सुविधा देण्यात येते. पाच वर्षांतून एकदा ही सवलत मिळते. दहावी आणि त्यापुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षांतून एकदा लॅपटॉप, ब्रेल नोट टेकर आणि ब्रेलर पुरवण्यात येते. कर्णबधिरांसाठी सहायक साधने  कर्णबधिरतेमुळे ऐकणे व बोलणे याबाबत अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कर्णबधीर व्यक्तीला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात. दरवाजाची बेल वाजली, रस्त्याने जाताना पाठीमागून हॉर्न वाजला, मोठा आवाज आला, घरात मूल रडले आदी प्रसंगी आवाज ऐकू येणारी व्यक्ती लगेच सावध होऊन त्या आवाजाला प्रतिसाद देते. पण कर्णबधीर व्यक्तीला श्रवण दोषामुळे प्रतिसाद देणे शक्य होत नाही. सहायक तंत्रज्ञामुळे आता कर्णबधीरदेखील यावर मात करताना दिसतात.
दरवाज्याची बेल वाजताच आवाजाबरोबर दिवा पेटतो. सकाळी लवकर उठण्यासाठी उशीखाली ठेवलेले कंपन यंत्र (व्हायब्रेटर) चोख काम करते. तर स्मोक डिटेक्टर, बेबी क्राय, वायरलेस पेजर, अम्प्लिफायर फोन्स, एफएम सिस्टिम आदी आधुनिक साधनांमुळे विकलांग लोकांच्या शिक्षण, रोजगार व सामाजिक स्वीकारतेत चांगले बदल घडून येत आहेत.
ऐकायला मदत करणारी शरीर स्तरीय श्रवण यंत्रापासून डिजिटल श्रवण यंत्रापर्यंत विविध प्रकारची श्रवण यंत्रे (कानामागील यंत्र) आता उपलब्ध आहेत. तसेच सावध करणारे संकेत देणारी साधने व संगणक आधारित प्रणाली आदी सुविधांमुळे कर्णबधीर व्यक्ती सामान्य व्यक्तीप्रमाणेच आपले जीवन जगू शकतो.
मोबाईलमधील टेक्स्ट मेसेज तंत्रज्ञान, संगणकातील ई-मेल सुविधांमुळे कर्णबधीर व्यक्तीला एकमेकाशी संपर्क करणे शक्य झाले आहे. आता तर तो ऑनलाइन सुविधांमुळे खुणाच्या भाषेत एकमेकांशी बोलताना दिसतो. भाषेचा प्रमुख अडथळाच या तंत्रज्ञानाने दूर केला आहे. तर कॅपशनिंग सुविधामुळे तो दूरचित्रवाणी व सिनेमाचा आस्वाद सहज घेऊ शकतो. त्याच्या दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानामुळे आमुलाग्र बदल झाला आहे.
सुधारित योजनेनुसार कॉकलीयर इम्प्लांटची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी सहा लाख रुपयांपर्यंत लाभधारकाना प्रतीयुनिट मदत केली जाणार आहे. दरवर्षी सुमारे पाचशे मुलांना याचा लाभ होईल, असे लक्ष ठरविण्यात आले आहे. उत्पन्न मर्यादेत वाढ  •  या सुधारित योजनेअंतर्गत ज्या लाभ धारकाचे मासिक उत्पन्न 15 हजारांपर्यंत आहे, अशा व्यक्तींना ही साधने मोफत दिली जातात.
•  त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो.
•  15 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास पन्नास टक्के सूट आणि त्यापेक्षा अधिक असल्यास साधनाची पूर्ण रक्कम भरावी लागते.•  निदान, चिकित्सा, उपचारांबरोबर ही सहायक साधने अपंग व्यक्तीच्या पुनर्वसनात महत्वाची भूमिका बजावतात.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment