अडीच हजार दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळ येते. या महामंडळाची स्थापना 24 फेब्रुवारी 1997 साली झाली. हे अपंगांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रम घेत आहे. अपंगांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठीही काही संस्थाना अल्प व्याजदराने कर्ज योजना, साहित्य खरेदी करण्यासाठीही कर्ज, व्यावसायिक शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. शिवाय अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात येत आहे. राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक म्हणून पी.सी. दास हे काम पाहत आहेत.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयामार्फत शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यापूर्वी दोन हजार जणांना याचा लाभ मिळत होता, तो आता अडीच हजार जणांना मिळणार आहे.

शिष्यवृत्तीचे लाभ

  • या योजनेंतर्गत मान्यताप्राप्त संस्थांकडील पदवी आणि पदव्युत्तर पातळीच्या व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासासाठी अपंग असलेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत.
  • यामध्ये मुलींसाठी 30 टक्के शिष्यवृत्ती राखीव राहणार आहे. महिला उमेदवार उपलब्ध नसतील तर पुरूष उमेदवारांचा विचार करण्यात येतो.
  • ही शिष्यवृत्ती त्रैमासिक पद्धतीवर देण्यात येणार आहे. यासाठी अगोदर अर्ज करावा लागेल. 
  • उमेदवारांनी (www.nhfdc.nic.in) या संकेतस्थळावरून आगाऊ ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • शिष्यवृत्तीमध्ये शासकीय आणि संलग्न संस्थांच्या अभ्यासक्रम शुल्काच्या मर्यादेत ना-परतावा शुल्काचा परतावा देण्यात येईल.
  • देखभालभत्ता म्हणून एका शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी 2500 रूपये आणि पदव्युत्तरसाठी तीन हजार रूपये 10 महिन्यांसाठी देण्यात येतात.
  • शिवाय पुस्तके/स्टेशनरी भत्ता म्हणून व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी सहा हजार तर पदव्युत्तरसाठी 10 हजार रूपये एक वर्षांकरिता देण्यात येतात.
  • विद्यार्थ्यांना आयुष्यात एकदा औषधे व इतर साधनसुविधेसाठी अर्थसहाय्य करण्यात येते. 
  • कोणत्याही माध्यमातून लाभार्थ्यांच्या पालक/नातेवाईक यांचे मासिक 25 हजार व वार्षिक तीन लाख उत्पन्न असू नये.
  • शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी अन्य कोणतीही शिष्यवृत्ती/भत्ता मिळणार नाही.

अर्ज कसा कराल

  • शिष्यवृत्तीसाठी (www.nhfdc.nic.in) यावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छापील प्रत संस्थेच्या प्रमुखाच्या शिफारशीसह राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळ (एनएचएफडीसी), 3 रा मजला, पीएचडी हाऊस, 4/2, सिरी इन्स्टिट्युशनल क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली-110016 येथे पाठवावी. 
  • उमेदवाराच्या अर्जाच्या हार्ड कॉपीशिवाय सॉफ्ट कॉपीचा विचार केला जाणार नाही.
  • या योजनेसाठी उमेदवार दि. 30 जून 2016 पर्यंत येत्या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करू शकतो.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

  • शैक्षणिक माहिती- राजपत्रित अधिकाऱ्यांकडून संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रशस्तीपत्र/गुणपत्रकांच्या साक्षांकित प्रती.
  • उत्पन्न पुरावा- पालक किंवा नातेवाईक यांच्या शेवटच्या पगाराच्या स्लिपसह वार्षिक उत्पन्न दाखला. तो महसूल अधिकारी/राजपत्रित अधिकारी/जनप्रतिनिधी म्हणजेच खासदार, आमदार, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांच्याकडील आयकर प्रमाणपत्राची स्वीकृती प्रत.
  • राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे अपंगत्वाचे साक्षांकित प्रमाणपत्र.
  • अभ्यासक्रम शुल्काची पावती (असल्यास), शैक्षणिक सत्रादरम्यान पूर्णपणे भरलेली असल्यास आणि संस्थेच्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्याद्वारे सही केलेली असणे आवश्यक.
  • जर शिष्यवृत्ती लागोपाठच्या वर्षात असल्यास मागील वर्षाच्या गुणपत्रकाची राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे साक्षांकित प्रत जोडावी.
  • बचत खात्याच्या पासबुकची प्रत आणि रद्द केलेले धनादेश.
इच्छुकांनी शिष्यवृत्तीच्या अधिक माहिती व तपशिलासाठी एनएचएपडीसीच्या संकेतस्थळाला (www.nhfdc.nic.in) ला भेट द्या किंवा दूरध्वनी क्र. 011-40541355, 45088638. फॅक्स क्र. 011-45088636 यावर संपर्क साधू शकता. शिवाय कार्यालयाचा ई-मेल- nhfdctf@gmail.com
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment